देशात ८ राज्यांसह १ केंद्रशासित प्रदेशात आजअखेर पशुधनामध्ये लम्पी स्किन रोगामुळे आतापर्यंत सुमारे ७०, १८१ हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी स्किन हा आजार विषाणूजन्य असून बाधित झालेल्या गाई-गुरांना ताप येतो. बाधित गुरे चारा खात नाहीत. त्यांची दूध उत्पादन क्षमता देखील घटते.
लम्पी आजारामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे ३९ जनावरे दगावली आहेत. यामध्ये पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील गुरांचा समावेश आहे. या आजारावरुन बऱ्याच अफवा पसरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. लम्पी हा गुरांचा त्वचा रोग मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. तशी माहिती शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन याबाबत जनजागृती करत आहे.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. या आजाराने बाधित गुरांचा मृत्यू दर केवळ १ ते २ टक्के इतकाच आहे. लम्पी हा त्वचा रोगाचा संसर्ग कीटकांच्या माध्यमातून पसरतो. माश्या, डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो. लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. या अशी लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न झाल्यास गुरे दगावण्याची शक्यता बळावते.
यासाठीच पशुपालकांनी गोठ्यात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. गोठ्यात माशा, डास, उवा होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी गुरांना बाधित गुरांपासून विभक्त ठेवणे गरजेचे आहे. तसेच बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडणे टाळले पाहिजे. गोठ्यात गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधणे आवश्यक आहे. हे सर्व लम्पी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आहेत. तसेच लसीकरण हा ठोस पर्याय आहे.
विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार नऊ सप्टेंबपर्यंत संपूर्ण देशात ७० हजार १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार करता राज्यस्थानमध्ये सर्वाधिक ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरातमध्ये ५३४४ आणि हरियाणात १८१० जनावरांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील लातूर जिल्हात १४ सप्टेंबर २२ रोजी लम्पीचा पहिला बळी गेला आहे. तर लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी २४ गावांमधे १७६ पशुधन बाधित झालेले आहे. ज्या गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून आला, त्या गावांच्या ५ किलोमीटर वर्तुळातील पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत सुमारे २३,३७८ पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच गोठ्यांमध्ये फवारणी करण्यावर भर देण्यात आला आहे. लम्पी आजार झालेल्या पशुधनाचे दूध पिल्यास मानवाला कोणताही धोका नाही. लम्पी बाधित पशुधनाचे दूध पिण्यास योग्य व पौष्टिकच आहे. या दूधापासून माणसाला कोणताही धोका नाही. असे लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन
विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्याची आकडेवारी पाहता आतापर्यंत १,७५५ गावांमध्ये ५ लाख ५१ हजार १२० जनावरांना लसीकरण करण्यात आले असून, लंपी लागण झालेल्या २,६६४ जनावरांपैकी १,५२० जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. यासोबत प्रत्येक तालुका पशुसंवर्धन केंद्रात लसही उपलब्ध करून देण्यात येत अाहे. ५० लाख डोस सद्यस्थितीत शासनाने उपलब्ध केलेले आहेत.