गरिबी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मुलांकडे होतंय दुर्लक्ष

‘वक्त’ हा जुना गाजलेला सिनेमा तुम्हाला आठवतो का? तीन मुलं, आई-वडिल असं छान सुखी कुटुंब. एक दिवस भूकंप होतो आणि या सगळ्या कुटुंबाची वाताहत होते. कुणी एका मुलाला दत्तक घेतं, एकाला आई सापडते आणि एक अनाथाश्रमात वाढतो. इथं मुलं देशोधडीला लागली ती भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे. पण अशा घटना प्रत्यक्षातही घडतात ते गरिबीमुळे आणि त्यासोबत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे. गरिबीमुळे गरजेपुरतं खाणं मिळवताना मुलांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेही हे घडताना दिसतं.

नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील गरिबांचा मानवी तस्करीचा धोका वाढतो असं तज्ञ सांगतात. बिहार आणि उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विशेषतः जिथं मानव विकास निर्देशांक सतत कमी असतो तिथं हे जास्त स्पष्ट होतं.

1998 साली गोरखपुरात आलेल्या पुरात विपुलचं घर वाहून गेलं आणि तो भावासोबत मुंबईत मजुरीवर काम करायला गेला. नंतर बरेच महिन्यांनी तो परतला तो अंगावर जखम घेऊन. त्याचा भाऊ विजय सांगतो, त्या लोकांनी याची किडनी काढून घेतली. कामाच्या शोधात तो पुन्हा मुंबईला गेला तो परतलाच नाही. पुराच्या घटनेआधी विजय, विपुल आणि त्यांच्या चार बहिणी गोखरपूर शहराबाहेर रोजंदारीवर काम करणाऱ्या त्यांच्या पालकांसोबत राहत होते. हातावरचं पोट असल्याने अर्थातच एवढ्या मोठ्या कुटुंबाचं कसंतरी भागत होते. त्यामुळेच विपुल 10 व्या वर्षीचं कामाला लागला. राप्ती नदीपासून जेमतेम किलोमीटरवर विपुलचं घर मोठ्या पावसानं आणि पुराच्या पाण्यानं गिळून टाकलं. या कुटुंबाला तिथून स्थलांतर करावं लागलं. गोरखपूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्यांनी आसरा घेतला. विपुलला मुंबईत पेंटरचं काम आणि 400 रुपये रोजंदारी मिळाली तेव्हा या कुटुंबाला जरा दिलासा मिळाला.

आता दोन दशकांनंतर विपुलचं कुटुंब अजूनही रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं राहतंय. विपुल अवयवांची तस्करी करणाऱ्यांना बळी पडला आणि त्याचे बाकी अवयवही त्यांनी काढून घेतले असावेत असं त्यांना वाटत राहतं.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील राप्ती, रोहिणी आणि घांग्रा या नद्यांना वारंवार पूर येऊ लागला आहे आणि त्यामुळे हजारो रहिवाश्यांना तिथून विस्थापित व्हावं लागत आहे. 2021 मध्ये 391 गावातील तीन लाख 12 हजार लोकांवर पुराची आपत्ती कोसळली. तर 56हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जवळपास हेच चित्र तिथं दरवर्षी पाहायला मिळतं.

2011 च्या जनगणनेनुसार, 20.9 दशलक्ष लोकांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील त्यांची मूळ गावं सोडली. जी भारताच्या एकूण स्थलांतरित लोकसंख्येच्या 37 टक्के आहे.

अभ्यासकांच्या म्हणण्यांनुसार, उत्तरप्रदेशातील गोरखपूर, महाराजगंज आणि कुशीनगर या जिल्ह्यातील जीवनाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे तेथील लोक सतत मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत असतात. वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्यांचं घर, शेती सर्वकाही उध्वस्त होत जातं आणि शहराकडे जाण्यासाठी ते अधिकाधिक प्रयत्न करू लागतात. मानवी तस्करी करणारे याच गोष्टीचा फायदा उठवतात आणि आपत्ती ही त्यांच्यासाठी संधी ठरते.

गंडक, बागमती, बुऱ्ही गंडक आणि कमला या बिहारच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे 2021 साली तीन दशलक्ष लोकांवर पुराची आपत्ती कोसळली. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या म्हणण्यांनुसार, 14 जिल्ह्यातील शेतजमिनीची नासाडी झाली आणि स्थानिकांना पावसाळ्यानंतर शेजारील राज्ये आणि नेपाळमध्ये क्षुल्लक नोकऱ्या शोधण्यास भाग पडले.

सीतामाऱ्ही जिल्ह्यातल्या भुली गावातला मोहम्मद फारूख. 2021 च्या ऑगस्टमध्ये काश्मीरातल्या एका वीटभट्टीत काम करत होता. नेपाळ सीमेजवळच्या भागमती नदीच्या पुरामुळे तेव्हा त्याच्या गावात पूर आला होता. फारूखला त्याच्या शेजाऱ्याचा फोन आला. त्यानं सांगितलं की फारूखचा मोठा मुलगा अब्दुल काही दिवसांपासून हरवला आहे. परत मुलाला पाहायला मिळेल की नाही या शंकेनं फारूखची चलबिचल झाली. पण कामाचा करार संपल्याशिवाय त्याला गावी परतता येणार नव्हतं. फारूख सांगतो, पावसाळा संपला की आम्ही कामाच्या शोधात काश्मीरला जातो. कारण गावात पैसे कमवण्यासाठी दुसरं काहीच काम मिळत नाही. त्यातून शेतात गाळ जमा होतो आणि त्यावर काहीच उगवत नाही. फारुखचा मुलगा अब्दुल त्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी सापडला. तिथून एक हजार किमीवर असणार्‍या जयपूर इथं पोलीसांनी एका बांगड्यांच्या फॅक्टरीत छापा घातला आणि तिथं 11 बाल कामगार सापडले त्यात अब्दुल होता. गावातून अपहरण करण्यात आलेला 15 वर्षांचा अब्दुल साधा भात, उरलेल्या शिळ्या अन्नावर जगला होता. पण अब्दुल आता घरी आनंदात नव्हता. त्याला आता पैसे मिळवायला बाहेर पडायचं होतं. तो सांगतो, त्या माणसाने मला 3000 रु महिना कबुल केले होते. तो मला 18000 रु देणं लागतो. पोलिसांनी मला घरी पाठवल्यामुळे ते पैसे मला मिळाले नाहीत.

अब्दुलला वाटतं, इथून बाहेर पडून काम केलं की आपण यशस्वी होऊ. किशोरवयीन मुलांना जयपूरला पळून जाण्यास पटवून देताना ब्रेन वॉशिंगची ही पद्धत अपहरकर्त्यांकडून वापरली जाते. निश्चित उत्पन्नाचं प्रलोभन, शहरी जीवन आणि चांगलं अन्न अशी प्रलोभनं मुलांना दिली जातात.

ज्यानं अब्दुलचं अपहरण केलं तो अब्दुलच्या मित्राचा दुसऱ्या गावातला नातेवाईक होता आणि नंतर सीतामाऱ्हीतल्या भेटीत पैसे देईन अशी आश्वासनंही तो देत राहिला.

मुलांच्या हक्काविषयी काम करणारे विशाल कुमार सांगतात, की शोषणकर्ते मुलांना शिकवतात की पोलिसांना किंवा तुमची इथून सुटका करून घेऊन जाणाऱ्यांना त्यांचं नाव सांगू नका. जर अपहरणकर्त्यांना अटक झाली तर तुमचा ठरलेला पगार ते देणार नाहीत.

2015 मध्ये सुटका झालेली काही मुलं आता मोठी आहेत पण तरीही सात वर्षांपूर्वी आपण केलेल्या कामाचे पैसे आजही आपल्याला मिळतील या आशेवर आहेत.

मुलं ज्या काळात सर्वाधिक असुरक्षित असतात अशा वेळी अपहरणकर्ते त्यांना लक्ष्य करतात. त्यामुळेच ते पूर यायची वाट पाहत असतात. एकदा मुलांचे वडील कामाच्या शोधात बाहेर पडले की हे अपहरणकर्ते किशोरवयीन मुलांना अलगद आपल्या जाळ्यात ओढतात.

दरवर्षी जयपूरच्या फक्त बांगड्यांच्या कारखान्यातून 200 मुलांची सुटका केली जाते, असं बालहक्क कार्यकर्ते सुरेश कुमार यांनी सांगितलं. सुटका केलेल्या मुलांची संख्या आम्हाला कळते पण खरोखर किती मुलांना पळवून नेलं होतं हे कधीच कळत नाही. हा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असू शकतो. बऱ्याच मुलांचा आजारानं, भुकेनं मृत्यू झालेला असू शकतो. कारण असे कारखाने कामगारांवर कधीच औषधोपचार करत नाहीत.

मुलांना पळवून नेणारे हे बहुतेकदा स्थानिकच असतात. त्यांना मुलांच्या घरातील अडचणी, समस्या माहित असतात आणि त्याचाच ते फायदा उठवतात. पूर समस्या ही आता दीर्घकाळ चालणारी आणि वारंवार येणारी, वाढत जाणारी समस्या आहे. त्यामुळे अधिकाधिक मुलंही अशा सापळ्यात अडकत आहेत.

एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2019 या काळात गोरखपूर भागातून 114 मुलांना पळवून नेण्यात आलं. त्यापैकी 63 बिहारमधील, 13 कुशीनगर आणि चार महाराजगंज या उत्तरप्रदेशातील जिल्ह्यातून होते.

एप्रिल 2015 ते जानेवारी 2016 या काळात कुशीनगरहून सात मुलांचं अपहरण झालं. पुढे फेब्रुवारी ते जुलै 2016 या सहा महिन्यात हा आकडा वाढून 35 वर पोहोचला. यावरून पावसाळ्याच्या काळात अशा अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं लक्षात येतं.

संदर्भ –Ground report: Climate disasters in Bihar, UP make children more vulnerable to trafficking

गरिबी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मुलांकडे होतंय दुर्लक्ष
Scroll to top