रात्रीची चांगली झोप ही फक्त शीला वाघमारेच्या आठवणीतच राहिली आहे. शीला 33 वर्षांची. ती सांगते, “गेली कित्येक वर्ष मी रात्रीची झोपू शकले नाहीये.” जमिनीवर टाकलेल्या गोधडीवर पायावर पाय ठेवून ती बसली आहे आणि तिच्या डोळ्यात वेदना उमटली आहे. जागून काढलेल्या रात्रींचं वर्णन करताना तिला रडू येतं. ते ती दाबण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, “मी रात्रभर रडत असते. मला गुदमरायला होतंय असं वाटत असतं.”
शीला बीड जिल्ह्यातल्या राजुरी घोडका या गावाबाहेर राहते. दोन खोल्यांच्या वीटकाम केलेल्या घरात ती, तिचा पती माणिक आणि कार्तिक, बाबू आणि ऋतुजा या मुलांसोबत राहते. तिच्या शेजारी झोपलेल्या या सर्वांनाच रात्री तिच्या रडण्याने जाग येत असते, ती सांगत असते, “माझ्या रडण्याने त्यांची झोप मोडते. मग मीही डोळे घट्ट मिटून झोपायचा प्रयत्न करते.” पण झोप येत नाही आणि रडणंही थांबत नाही.
मला सारखं उदास वाटत राहतं आणि काळजी वाटत राहते, शीला म्हणते. तिच्या आवाजात चिडचिड जाणवते. माझी गर्भपिशवी काढल्यापासून हे सगळं सुरू झालं. त्यामुळे माझं आयुष्यचं कायमच बदलून गेलं. गर्भाशय काढून टाकलं तेव्हा ती फक्त 20 वर्षांची होती. तेव्हापासून दुःख, निद्रानाश, चिडचिड आणि शारीरिक वेदनांचा त्रास दीर्घकाळासाठी तिला सहन करावा लागला आहे. “कधीकधी मला विनाकारणच मुलांचा राग येतो. त्यांनी प्रेमाने काही मागितलं तरी मी त्यांच्यावर ओरडते,” शीला असहाय्यपणे बघत असते. “मी प्रयत्न करते. चिडचिड न करण्याचा मी खरोखरच प्रयत्न करते. मी अशी का वागते हे मलाही समजत नाही.” माणिकशी लग्न झालं तेव्हा शीला फक्त 12 वर्षांची होती. 18 वर्षांची व्हायच्या आतच ती तीन मुलांची आई झाली.
अंदाजे आठ लाख ऊस तोडणी कामगारांपैकी शीला आणि माणिक एक आहेत. ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या ऊस तोडणी हंगामात ते मराठवाड्यातून हंगामी स्थलांतर करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊसाच्या शेतात राहतात.
गर्भाशय काढून टाकण्याचा शस्त्रक्रियेनंतरच्या आजारांचा शीलाचा अनुभव ही काही महाराष्ट्राच्या या भागातली दुर्मिळ घटना नाही. बीडमधील ऊस तोडणाऱ्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात होणाऱ्या हिस्टरेक्टमीच्या घटनांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने 2019 मध्ये सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीला असं आढळून आलं, की हिस्टरेक्टमी झालेल्या स्त्रियांमध्ये मानसिक त्रास सामान्य आहे. विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ.नीलम गोऱ्हे या समितीच्या अध्यक्ष होत्या. या समितीने 2019 च्या जून-जुलैमध्ये 82 हजार 309 ऊस तोडणी कामगार महिलांचा सर्व्हे केला. त्यात आढळलं की 13 हजार 861 स्त्रियांपैकी ज्यांनी हिस्टरेक्टमी केली होती, त्यापैकी 45 टक्क्यांहून अधिक म्हणजे 6,314 महिलांना निद्रानाश, उदास मनःस्थिती, सांधेदुखी आणि पाठदुखी अशा मानसिक आणि शारीरिक त्रासांचा अनुभव आला होता.
डॉ. कोमल चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार हिस्टरेक्टमी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तिचा स्त्रियांच्या आरोग्यावर दीर्घ कालावधीसाठी विपरीत परिणाम होतो. डॉ. चव्हाण या मुंबईत स्त्रीरोगतज्ञ म्हणून व्ही.एन.देसाई म्युनिसिपल जनरल हॉस्पीटल येथे काम करतात. वैद्यकीय भाषेत याला सर्जिकल मेनोपॉज किंवा शस्त्रक्रिया करून आणलेली रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं, डॉ. चव्हाण सांगतात.
या शस्त्रक्रियेनंतर बरीच वर्ष शीला यांना सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी आणि सततचा थकवा अशा आजारांचा अनुभव आला. “दर दोनतीन दिवसांनी मला काहीतरी वेदना होत असतात,” ती सांगते. वेदनाशामक मलमे आणि गोळ्या तात्पुरता आराम देतात. हे मलम मी गुडघा आणि पाठीच्या दुखण्यासाठी वापरते. महिन्याला दोन ट्यूब लागतात मला, ती सांगते. हे सांगतानाच ती 166रुपयांची वेदनाशामक औषधाची ट्यूब दाखवते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या आहेतच. महिन्यातून दोन वेळा ती ग्लुकोजचे सलाईन लावून घेते. सतत येणारा थकवा दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिच्या घरापासून साधारण किलोमीटर दूर असलेल्या खाजगी दवाखान्याची फी आणि औषधं मिळून दर महिन्याला तिला 1-2 हजार रुपये खर्च येतो. बीडचं सरकारी रुग्णालय तिच्या गावापासून दहा किमी दूर आहे. त्यामुळे ती जवळच्या दवाखान्यालाच प्राधान्य देते. ती म्हणते, “कोण इतक्या दूर जाईल, त्यातही गाडीभाड्यासाठी जास्त पैसे खर्च करून?” भावनिक उलथापालथ होते ती मात्र ही औषधं थांबवू शकत नाहीत. “असा सगळा त्रास असल्यावर का म्हणून जगावं वाटेल?” शीला विचारत असते.
“हिस्टरेक्टमीमुळे शारीरिक दुष्परिणामांव्यतिरिक्त हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यामुळे नैराश्य आणि भीती निर्माण होत असावी,” असं मुंबई येथील मानसोपचारतज्ञ डॉ. अविनाश डिसूझा म्हणतात. हिस्टरेक्टमी किंवा अकार्यक्षम अंडाशयाशी संबधित आजारंची तीव्रता बदलत असते, ते म्हणाले. हे प्रत्येक केसबाबत वेगळे असते. काही स्त्रियांना गंभीर परिणाम होतात तर काहींना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
या शस्त्रक्रियेनंतरही शीला माणिकसोबत पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करत होतीच. बीडपासून 450 किमीवरच्या कोल्हापूर इथल्या ऊस गाळप कारखान्यात ती कुटुंबासोबत जातेच. “आम्ही दिवसाला 16 ते 18 तास काम करून दोन टन ऊसाची कापणी करायचो,” शस्त्रक्रियेपूर्वीचे दिवस आठवून शीला सांगत असते. कापलेल्या आणि बांधलेल्या प्रत्येक टनासाठी प्रत्येक कोयत्याला 280 रुपये मिळायचे. कोयता म्हणजे खरंतर विळा ज्याने ऊस कापला जातो. परंतु, इथं हा शब्द ऊस तोडणी जोडप्यासाठी वापरला जातो. अशी एक जोडी मुकादमाने आगाऊ रक्कम देऊन कामावर घेतलेली असते.
“सहा महिन्यांनी आम्ही 50 ते 70 हजार रुपये मिळवतो.” तिच्या हिस्टरेक्टमीनंतर या जोडप्याला दिवसाला एक टन ऊसाची कापणी आणि बंडल बांधणी करणं आता कठिण जातं. “मी जड ओझं उचलू शकत नाही आणि आधीसारखी वेगाने कापणी करू शकत नाही,” शीला सांगत असते. पण शीला आणि माणिकने 2019 साली घरदुरूस्तीसाठी 30 टक्के व्याजाने 50हजार रुपये आगाऊ घेतले आहेत. आता ते व्याज आणि मुद्दल फेडण्यासाठी काम करत राहणे हाच उपाय त्यांच्याकडे आहे. “हे कधीच संपणारं नाही,” शीला म्हणते.
मासिक पाळीच्या काळात ऊसाच्या शेतात पाठ मोडून काम करणं हे स्त्रियांसाठी सर्वात आव्हानात्मक काम असते. शेतात शौचालये आणि स्नानगृहे नसतातच शिवाय त्यांची राहण्याची व्यवस्थाही चांगली नसते. कोयते त्यांच्या मुलांसोबत शेतात किंवा ऊस गाळप कारखान्यांजवळच्या तंबूत राहतात. पाळीच्या काळात काम करणं अवघडचं, शीला सांगते. एक दिवस काम केलं नाही तर मुकादम तेही पैसे कापतो. अशावेळी स्त्रिया त्यांच्या पेटीकोटच्या कापडासून पॅड तयार करून ते वापरतात आणि कामाला जातात. हे कापड न बदलताच 16 तास त्या काम करतात. “दिवसभराचं काम संपल्यावरच ते बदलायला वेळ मिळतो,” ती सांगते. “रक्ताने पूर्ण भिजून रक्त टपकायचे कपड्यातून,” ती सांगत असते. कपडे धुवायला पुरेसं पाणी नाही, वाळवायला पुरेशी जागा नाही त्यामुळे कित्येकदा ओलसर पॅडचं पुन्हा वापरायला लागायचे. “त्याला वास यायचा पण सूर्यप्रकाशात असे कपडे वाळवायचे तर ते बरं वाटायचं नाही. आजूबाजूला बरीच माणसं असायची.” तिला सॅनिटरी पॅड्स माहितीच नव्हते. “माझ्या मुलीला पाळी येऊ लागली तेव्हाच मला कळले,” ती सांगते. आता 15 वर्षांच्या ऋतुजासाठी ती पॅड्स खरेदी करते. तिच्या आरोग्याबाबत मला हेळसांड करायची नाही, ती सांगते.
2020 मध्ये ‘मकाम’ या महिला शेतकऱ्यांसाठीच्या पुणे स्थित संस्थेने महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यांमधील 1,042 ऊस तोडणी मजूरांच्या मुलाखतींचा सर्व्हे प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 83 टक्के ऊस तोडणी महिला कामगार या पाळीदरम्यान कापड वापरतात. 59 टक्के महिलांना कापडी पॅड धुण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तर 24 टक्के महिलांना ओले पॅड्स पुन्हा वापरावे लागतात. अशा अस्वच्छ वापरामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव, वेदनादायक पाळी अशा स्त्रीरोगविषयक समस्या वारंवार उद्भवतात. शीला म्हणते, “माझ्या ओटीपोटात मला वारंवार वेदना व्हायच्या आणि योनीतून पांढरा जाड स्त्राव येत होता.” “मासिक पाळीच्या काळातील अस्वच्छतेमुळे होणारे संसर्ग अगदी सामान्य आहेत आणि साध्या औषधांनी त्यावर उपचार करता येतात.” डॉ. चव्हाण म्हणतात, “हिस्टेरेक्टमी हा या सगळ्यासाठी पर्याय नाही तर कर्करोग, गर्भाशय पुढे सरकणे किंवा फायब्रॉईड असतील तर त्याबाबतीतला शेवटचा उपाय आहे.” मराठीत नाव लिहिण्यापलीकडे लिहीता वाचता न येणाऱ्या शीलाला असा संसर्ग बरा होऊ शकतो याची कल्पनाच नव्हती. इतर ऊस तोडणी महिलांप्रमाणेच तीही वेदना कमी करण्यासाठी औषधे मिळावीत या आशेने बीड शहरातील एक खाजगी रुग्णालयात गेली. वेदना कमी झाल्या तर मासिक पाळीत काम करता येईल आणि मुकादमाला दंडही द्यावा लागणार नाही. पण दवाखान्यात गेल्यावर तिथल्या डॉक्टरने तिला कॅन्सर असल्याची शक्यता बोलून दाखवली. “रक्त तपासणी, सोनोग्राफी काहीच केलं नाही. तो म्हणाला, “माझ्या गर्भाशयाला छिद्र आहे. आणि पाच-सहा महिन्यात मी कॅन्सरने मरेन,” शीला आठवून सांगते. घाबरलेली शीला ऑपरेशनसाठी तयार झाली. आणि “त्याच दिवशी काही तासांनी, डॉक्टरनी माझी काढलेली पिशवी पतीला दाखवली आणि सांगितले की या छिद्रांकडे पाहा,” ती म्हणते. सात दिवस शीलाला दवाखान्यात राहावं लागलं. 40 हजाराची बचत संपवून आणि नातेवाईक, मित्रांकडून कर्ज घेऊन माणिक यांनी दवाखान्याचा खर्च भागवला.
ऊस तोडणी कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी काम करणारे बीड जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते अशोक तांगडे म्हणतात, की अशा शस्त्रक्रिया बरेचदा खाजगी दवाखान्यातच पार पडतात. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय हिस्टरेक्टमीसारखी गंभीर शस्त्रक्रिया डॉक्टर करतात हे खरोखर अमानवी आहे. 90 टक्क्यांहून अधिक महिलांनी खाजगी दवाखान्यात अशा शस्त्रक्रिया केल्या होत्या, याला शासनाने नेमलेल्या समितीनेही दुजोरा दिला. या शस्त्रक्रियेचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात असा कोणताही वैद्यकीय सल्ला शीलाला मिळालेला नव्हता. “मी पाळीतून मुक्त झाले, पण त्यापेक्षाही वाईट आयुष्य मी आता जगते आहे,” ती म्हणते. रोजगार कपातीची भीती, मुकादमाचे जाचक नियम आणि नफेखोर खाजगी शल्यचिकित्सक, बीड जिल्ह्यातील सर्वच महिला ऊसतोड कामगारांसाठी या एकसमान कथा आहेत.
शीलाच्या घरापासून सहा किमीवरच्या काठोडा गावच्या लता वाघमारेची गोष्टही फार काही वेगळी नाही. 32 वर्षांची लता म्हणते, “मला जगावंसंच वाटत नाही.” तिची हिस्टरेक्टमी झाली तेव्हा ती फक्त 20 वर्षांची होती. “आमच्यात आता काही प्रेमच राहिलं नाहीये,” नवरा रमेशसोबतच्या नात्याविषयी ती बोलत असते. तिच्या शस्त्रक्रियेनंतर वर्षभराने हे सुरू झालं. कारण तेव्हा ती चिडचिडी झाली आणि अधिक दूर राहू लागली. “तो जवळ येतो तेव्हा मी त्याला दूर ढकलते.” लता सांगते. “मग भांडणं, आरडाओरडा होई.” तिच्या सततच्या नकारामुळे पतीचीही इच्छा संपली. ती सांगते, “आता तो माझ्याशी नीट बोलतही नाही.” शेतमजूर म्हणून कामावर जाण्याआधी घरातल्या कामात तिचा दिवस जातो. तिच्या गावात किंवा शेजारच्या गावात ती इतरांच्या शेतात 150 रूपये रोजावर काम करते. तिला गुडघे, पाठदुखी आणि डोकेदुखीचा वारंवार त्रास होतो. आराम मिळावा म्हणून मग ती वेदनाशामक गोळ्या घेते किंवा घरगुती उपचार करते. “मला कशी त्याच्या जवळ जायची इच्छा होईल?” ती म्हणते. लताचं 13 व्या वर्षीचं लग्न झालं आणि वर्षभरातच आकाशचा जन्म झाला. आता तो 12 वी पर्यत शिकला असला तरी आईवडिलांसोबत ऊसाच्या शेतातच काम करतो. लताला आणखी एक मुलगी होती. पण पाच महिन्यांची असताना ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. तान्ह्या बाळांसाठी किंवा मुलांसाठी कोणत्याही सोयी नसल्यामुळे ऊस तोडणी जोडप्यांना आपल्या लहान मुलांना शेतात सोडणं भाग पडतं. या प्रसंगाचं वर्णन करणं तिला जड जातं. ती म्हणते, “मला काही काम करावंसं वाटत नाही. काही न करता नुसतं बसून राहावंसं वाटतं.” तिला कोणत्याही कामात रस वाटत नसल्यामुळेच मग कामात चुका होतात. “कित्येकदा मी गॅसवर दूध किंवा भाजी ठेवलेली असते. दूध ऊतू जातं किंवा जळतं पण तरीही मी नुसती बसून असते.” आपली मुलगी गमावूनही, लता आणि रमेशला ऊस तोडणीच्या हंगामात स्थलांतर थांबवणं परवडणारं नाही. लताने नंतर अंजली, निकिता आणि रोहिणी अशा तीन मुलींना जन्म दिला. आणि त्यांनाही ती शेतावर घेऊन जात राहिली. “काम केलं नाही तर मुलं उपासमारीने मरतील. आणि कामाला गेलो तर अपघातात मरतील.” “काय फरक आहे?” लता थेटपणे म्हणते.
कोविडकाळात शाळा बंद झाल्या आणि स्मार्टफोन नसल्यामुळे घरून ऑनलाईन शिक्षण शक्य नव्हतं. त्यामुळे तिच्या मुलींचं शिकणं अचानक थांबलं. अंजलीचं 2020मध्ये लग्न झालं आता निकिता आणि रोहिणीसाठी योग्य वराचा शोध सुरू आहे. मार्च 2020 पासून निकिताने शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम सुरू केलं. तिच्या आईवडिलांसोबत ती ऊस कापणीला जाते. ती सांगते, “मी सातवीपर्यंत शिकले आहे. मला शिकायचं आहे. पण आता शक्य नाही. माझे पालक आता माझं लग्न करून द्यायच्या विचारात आहेत.”
नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशी जाहीर झाल्यापासून गेली तीन वर्ष त्याची अंमलबजावणी मंदावली आहे. कामाच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालये आणि ऊस तोडणी कामगारांसाठी तात्पुरती घरं देण्याचे निर्देश अजूनही कागदावरच आहेत. “कोणती शौचालयं आणि कोणती घरं” असं विचारून शीला त्यांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती कधी बदलेल ही कल्पनाही खोडून काढते. “सर्व काही आहे तसंच आहे.”
दुसरी शिफारस म्हणजे कामाच्या ठिकाणी आशा आणि अंगणवाडी सेविकांचे गट तयार करणे. म्हणजे या सेविका ऊस तोडणी कामगार महिलांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करू शकतील.
आशा सेविका इथं भेट देतात का, असं विचारल्यावर लता सांगते, “इथं कुणीच येत नाही. दिवाळीनंतरचे सहा महिने आम्ही ऊसाच्या शेतातच असतो. घरं या काळात बंद असतात.” काठोडा येथील 20 कुटुंबांच्या दलित वस्तीत राहणारे हे नवबौद्ध कुटुंब असल्याने, गावकऱ्यांकडून त्यांना नेहमीच भेदभावाची वागणूक मिळते. ती पुढे म्हणते, “आम्हाला विचारायला कुणीच येत नाही.”
बीडमधले कार्यकर्ते तांगडे म्हणतात, की बालविवाहाची समस्या आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षित स्त्रीरोगतज्ञांची कमतरता या समस्यांवर तातडीने उपाय करणं आवश्यक आहे. नंतर दुष्काळ आहे, रोजगाराच्या संधी नाहीत. ऊसतोड कामगारांचे प्रश्न केवळ स्थलांतरापुरते मर्यादित नाहीत.
दरम्यान, शीला, लता आणि इतर हजारो स्त्रिया सध्याच्या ऊस कापणीच्या हंगामात घरापासून शेकडो किलोमीटर दूर, निकृष्ट तंबूत राहत आहेत आणि अजूनही स्वच्छतेच्या कुठल्याही सुविधेशिवाय कापडी पॅड वापरत आहेत. “मला अजून बरीच वर्ष काढायची आहे. कसं जगायचं ते माहित नाही,” शीला म्हणते.